१४ ऑगस्ट : अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात महिला विकास कक्षातर्फे विद्यार्थिनींसाठी उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी रत्नागिरीतील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. तोरल शिंदे यांनी ‘मासिकपाळी आणि शारीरिक व मानसिक स्वास्थ्य‘ या विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
मासिकपाळी दरम्यान आपण कशी काळजी घ्यावी, आहार कसा असावा, नित्यनेमाने कोणत्या गोष्टी कराव्यात अथवा करू नये यावर डॉ. तोरल शिंदे यांनी मार्गदर्शन केले. तसेच या वयात मुलींनी मुलांबरोबर वावरताना आपली मर्यादा ओळखली पाहिजे तसेच पालकांशी सुसंवाद साधला पाहिजे जेणेकरून तेच आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहतात. अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर डॉ. तोरल शिंदे बोलल्या.
या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, पर्यवेक्षक प्रा. विद्याधर केळकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला विकास कक्षाच्या समन्वयक प्रा. अपर्णा तगारे, अतिथी परिचय प्रा. विस्मया कुलकर्णी तसेच सूत्रसंचालन व आभार प्रा. मनस्वी लांजेकर यांनी केले. या प्रसंगी वाणिज्य विभागप्रमुख प्रा. शिल्पा तारगावकर व महिला विकास कक्षाचे सर्व सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी सक्रिय सहभाग घेतला व डॉ. तोरल शिंदे यांच्याशी मनमुराद संवाद साधला.