महिलांच्या आरोग्यासाठी काम करत असताना कोकणातल्या ग्रामीण भागातील वंध्यत्वाच्या समस्येची जाणीव झाल्यानंतर त्यासाठी विशेष शिक्षण घेऊन कोकणातील पहिले टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सुरु करत अनेक कुटुंबाच्या घरी आनंद वाटणा-या डॉ. तोरल निलेश शिंदे यांचा कोल्हापूर येथे सन्मान करण्यात आला. Indian Society for Assisted Reproduction या संस्थेने मानाचा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला.
सन २०१४ मध्ये रत्नागिरीत कोकणातील पहिले रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सुरु करून डॉ. तोरल शिंदे यांनी अनेक महिलांना अपत्य प्राप्तीसाठी एक आशेचा किरण दाखवला होता. सुमारे 9 वर्षांपूर्वी अपत्य प्राप्तीसाठी खर्चिक वाटणारी ही उपचार पद्धती कोकणातील रत्नागिरी शहरातील शिवाजी नगर येथील धन्वंतरी रुग्णालयात सुरु करताना इथल्या महिलांच्या आर्थिक, सामाजिक आणि मानसिक स्थितीचा प्रामुख्याने त्यांनी विचार केला. या उपचार पद्धतीबद्दल असणारे समाज गैरसमज दूर करण्यासाठी तब्बल दोन वर्षे दर महिन्याला रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये त्यांनी मोफत तपासणी शिबिरे आयोजित करून महिलांच्या शंकांचे आणि भीतीचे निरसन केले. तर टेस्ट ट्यूब बेबी उपचार पद्धतीतील इक्सी सारख्या प्रगत उपचार पद्धती सुद्धा रत्नागिरीमध्ये उपलब्ध करून दिली. त्यांच्या अथक आणि सततच्या प्रयत्नांमुळे आजपर्यंत अनेक घरांमध्ये लहान बाळांच्या रडण्याचे आवाज ऐकू येऊ लागले आहेत. अनेक जोडपी अपत्य प्राप्तीमुळे आनंदी झाली आहेत. डॉ. तोरल यांच्या याच कामाची दखल Indian Society for Assisted Reproduction या संस्थेने घेतली आणि त्यांचा मान्यवरांच्या हस्ते कोल्हापूर येथे झालेल्या मोठ्या सोहळ्यात ISAR पुरस्कार देवून सन्मान केला. या बद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजन सुर्वे, राष्ट्रवादी काँग्रेस रत्नागिरी विधानसभा क्षेत्राध्यक्ष श्री.रामभाऊ गराटे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्री.संकेत कदम, राष्ट्रवादी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष श्री.सिद्धेश शिवलकर, महिला तालुकाध्यक्ष रत्नागिरी, राष्ट्रवादी महिला शहर अध्यक्ष रत्नागिरी नेहालीताई नागवेकर व सौ जोशी आदी उपस्थित होते.